To Reach The People & Community!
 दिनविशेष

 सोलापूर

लम्पीचा धोका टाळण्यासाठी जनावरांनाही पीपीई किट

THE XYE   12-10-2023 13:30:54   93

लम्पीचा धोका टाळण्यासाठी जनावरांनाही पीपीई किट

 

सोलापूर दि. १२ ( प्रतिनिधी ) : मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात लम्पी रोगाने  पशुपालक हैराण झाले असून, लाखो रुपये किमतीची जनावरे या रोगामुळे दगावली आहेत.तर, शासनाकडून होत असलेल्या उपाययोजनाही पूर्णपणे काम करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संसर्ग थांबवण्यासाठी शासनाला गुरांचे बाजार, बैलांच्या शर्यतींवर निर्बंध आणण्याची वेळ आली आहे.

     अशावेळी सांगोला तालुक्यातील महूद गावाच्या एका कपडे व्यापा-याने जनावरांसाठी आता पीपीई किट बनवले आहे. यामुळे लम्पीचा धोका टाळून संसर्ग देखील रोखता येण्याचा दावा जितेंद्र बाजारे यांनी केला आहे. विशेष म्हणजे अतिशय कमी किमतीत यामुळे आपले पशुधन वाचवता येईल यासाठी शासनाने हा प्रयोगाचा वापर करण्याचे आवाहन देखील बाजारे यांनी केले आहे.

      जनावरांवर लम्पीचा धोका वाढू लागल्यावर बाजारे यांनी याचा नीट अभ्यास करून जनावरांसाठी पीपीई किट बनविण्याचा प्रयोग केला. सुरुवातीला यासाठी कॉटन कापडाचे किट बनवून पहिले. त्यानंतर त्यांनी ९० जीएसएम जाडीचे नॉन ओव्हन फॅब्रिक घेऊन त्यापासून पीपीई किट बनवल्े. हे किट बनविताना त्या किटला काही विशिष्ट ठिकाणी कप्पे करून त्यात डांबरगोळ्या ठेवल्या. एक माणूस सहजासहजी हे किट जनावरांना घालू शकेल अशा पद्धतीने या किटची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे किट असताना देखील गुरांची तपासणी, दूध काढणे शक्य आहे. बाजारे यांच्या गोठ्यात गेल्या २० वर्षांपासून ५५ जनावरे आहेत. त्यामुळे त्यांनी या किटची पहिली ट्रायल आपल्या गोठ्यातील जनावरांवर केली.

     बाजारे यांनी सुरुवातीला लम्पी झालेल्या एका गायीला हे किट घातले. त्यामुळे ती गाय वाचलीच शिवाय, त्याचा संसर्ग इतर गायींना देखील झाला नाही. बाजारे यांनी यानंतर सांगोला तालुक्यातील लम्पीची साथ मोठ्या प्रमाणात असणा-या लोटेवाडी, अजनाळे, माळशिरस, शंकरनगर अशा विविध गावांत जाऊन या किटचा प्रयोग केला. यामुळे, लम्पीचा संसर्ग झालेली जनावरे वाचली असून, त्यांचा प्रादुर्भाव इतर जनावरांना न झाल्याने शेतक-यांचे लाखो रुपयांचे पशुधन वाचण्यास मदत झाली.

     तर, आपण बनवलेले पीपीई किट साधारण १३०० ते १४०० रुपयांच्या खर्चात तयार होत असून, यामुळे लाखो रुपयांच्या पशुधनाचे संरक्षण होत असल्याने शासनाने हे पीपीई किट वापरून लम्पी रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जितेंद्र बाजारे यांनी केले आहे. लम्पी या संसर्गजन्य रोगामुळे आत्तापर्यंत राज्यभरात हजारो मुक्या जनावरांचे प्राण गेल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारे यांनी तयार केलेल्या या पीपीई किटमुळे जर खरेच लम्पी संसर्ग रोखणे शक्य होत असेल, तर कोविडनंतर आता लम्पीसाठी जनावरांच्या पीपीई किटचा प्रयोग होऊ शकणार आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती