To Reach The People & Community!
 दिनविशेष

 सोलापूर

९६ कुळी मंदिराचा ऐतिहासिक वारसा लाभलेली! जागृत देवस्थान करमाळ्याची कुलस्वामिनी आई कमला भवानी

THE XYE   20-10-2023 16:02:38   96

९६ कुळी मंदिराचा ऐतिहासिक वारसा लाभलेली! जागृत देवस्थान करमाळ्याची कुलस्वामिनी आई कमला भवानी

 

सोलापूर. दि.२०. ( प्रतिनिधी ): महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे कमला भवानी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.

     नवरात्री उत्सवात देशभरातून अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.कमला भवानी मंदिराचे बांधकाम इसवीसन १७२७ च्या सुमारास सुरु करण्यात आले असावे असे अनुमान आहे.

कमला भवानी मातेच्या मंदिराची रचना

     रावरंभा निंबाळकर यांच्या करमाळा जहागिरीमध्ये ९६ खेडी होती. त्यामुळे ९६ या अंकाला या कमलादेवी मंदिरात विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मंदिर ९६ खांबावर उभारले असून मंदिराला जाण्यासाठी ९६ पायर्‍या आहेत. मंदिरात ९६ ओवर्‍याचे भक्तनिवास आहे. मंदिरामध्ये सजावटीसाठी ९६ शिल्पचित्रे लावलेली आहेत. स्थापत्यशास्त्रचा उत्कृष्ट नमुना असलेली ९६ पायर्‍याची हत्ती बारव मंदिर परिसरातच आहे.

     कमलाभवानी देवी संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानली जाते. कमलाभवानी आईची मूर्ती गंडकी शिळेतील असून पाच फुटी उंच, सिंहारूढ आणि महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली अष्टभुजा आणि विविध आयुधे धारण करणारी महिषमर्दिनीची आहे. देवीच्या मूर्तीच्या वरील बाजूस उंच शिखर सहा स्तरीय असून त्यावर विविध देवी देवतांची शिल्पे कोरलेली आहे.

     मंदिरात कमला भवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे. त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे. गाभाऱ्यात श्री विष्णू-लक्ष्मीची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभाऱ्यात सूर्यनारायणाची सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या समोर मोकळ्या जागेत ८० फुटी उंच दीपमाळ असून त्यावर जाण्यासाठी आतील बाजूला ९६ पायऱ्या आहेत.

कमला भवानी मातेच्या मंदिराचा इतिहास

     फलटणचे बजाजी नाईक-निंबाळकर यांचे पुत्र महादजी यांचे पुत्र म्हणजे रावरंभा निंबाळकर. यांचा कार्यकाळ १७०७ ते १९४२ अशी जवळजवळ २२३ वर्षे रावरंभा निंबाळकर यांच्या वंशजांकडे जहागिरी होती. ती त्यांना निजामाकडून मिळाली होती. निजामाच्या वतीने त्यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग, तुळजापूर, भूम, सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा, शेंद्री, रोपळे, दहीगाव, परभणी जिल्ह्यातील पाथरी, लातूर जिल्ह्यातील राजुरी, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील काही गावे आणि २२ हजारांची मनसब म्हणून मिळाली होती. रावरंभा यांना पालखी आणि मशालीचा मान होता.

     रावरंभा घराण्यातले रंभाजी, जानोजी, आनंदराव, रावरंभा दुसरे, खंडेराव यांच्यासारखे पराक्रमी पुरुष शेवटपर्यंत निजामशाहीत राहिले. या घराण्यात युद्धकलेबरोबर साहित्यकला, सौंदर्यदृष्टी यांचेही वरदान होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत म्हणजे तुळजापूरची आई भवानी. रंभाजी नाईक-निंबाळकर हे बरीच वर्षे तुळजापूर येथे वास्तव्यास होते. या काळात त्यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाजूच्या ओवऱ्या आणि जवळपास बारा ते पंधरा फूट रुंदीची भिंत आणि पूर्व-पश्चिमेला दोन भव्य दरवाजे बांधले. त्यामुळेच भवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘सरदार निंबाळकर’ हे नाव देण्यात आलेले आहे. आजही तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वाराला सरदार निंबाळकर दरवाजा म्हणतात.

    रावरंभा रंभाजी निंबाळकर देवीचे उपासक बनले. तुळजापूरनंतर त्यांनी माढ्याचे माढेश्वरी व त्यानंतर करमाळ्याचे कमलादेवी मंदिर बांधले. तुळजापूर आणि माढ्याची मंदिरे किल्ल्याच्या धाटणीची आहेत. परंतु करमाळा येथील मंदिर बांधकामशैली ही पूर्णत: नाविन्यपूर्ण आहे. रंभाजीचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी हे मंदिर दाक्षिणात्य पद्धतीने बांधले.

     इ.स. १७४० ते १७४३ च्या दरम्यान रावरंभा जानोजी राव हे रघुजी भोसलेसमवेत दक्षिणेतील त्रिचनापल्लीच्या स्वारीवर गेलेले असताना तेथील मंदिराच्या प्रवेशद्वारावरील बांधकामाची ‘गोपुरशैली’ त्यांना फार भावली. रंभाजीच्या काळात सुरु झालेले कमलाभवानी मातेच्या मंदिराचा काम जानोजीरावांनी पूर्ण केले, मात्र मंदिराच्या रचनेत महत्वाचे बदल करून त्यांना दाक्षिणात्य पद्धतीची गोपुरे बसवली.

कमला भवानी मातेच्या  मंदिराकडे येण्याचे मार्ग

     करमाळा हे गाव टेंभुर्णी - नगर रस्त्यावर टेंभुर्णी पासून ४५ कि. मी. व नगर पासून १०० कि. मी. अंतरावर आहे. मुंबई - चेन्नई रेल्वे मार्गावरील जेऊर रेल्वे स्थानक हे करमाळ्यापासून १८ कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून भिगवण मार्गे करमाळ्याचे अंतर १६५ किमी व सोलापूर वरून १३५ कि.मी. आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती