To Reach The People & Community!
 दिनविशेष

 व्यक्ती विशेष

विचारप्रवर्तक दूरदृष्टीचे संशोधक रघुनाथ धोंडो कर्वे

THE XYE   16-10-2023 23:46:06   122

विचारप्रवर्तक दूरदृष्टीचे संशोधक रघुनाथ धोंडो कर्वे

जगाच्या पुढं चार पाऊल चालायला एक विलक्षण दूरदृष्टी, बुद्धी आणि कमालीचा निग्रह ही लागते  . हा तर एका समाजसुधारकाच्या घरात जन्माला आलेला , मॅट्रिकला पाहिलं येणं , गणित आणि फ्रेंच या दोन्ही विषयात  असामान्य गुणवत्ता  नोंदवणं हे त्याला बिलकुल कठीण गेलं नाही . 

आपल्या जगावेगळ्या सुधारक मोहिमेला लोकांच्या गळी उतरवणं मात्र त्याला  सर्वात कठीण गेलं . अर्थात हा हार मानणारा नव्हता ...

त्याच्या सळसळत्या क्रांतिकारी  विचारांची धग विल्सन सारख्या आधुनिक  महाविद्यालयालाही सहन झाली नाही आणि त्याला तेथील  प्राध्यपकी पेशावर पाणी सोडावं लागलं ... 

१४ जाने. १८८२ - १४ ऑक्टो. १९५३. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसंबंधी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे भारतातील एक आद्य विचारवंत. जन्म मुरुड या गावी. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र. मॅट्रिक परीक्षेत मुंबई राज्यात सर्वप्रथम (१८९७). फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. ए. (१९०३). १९०६ मध्ये अध्यापनाची पदविका. गणित विषयात एम्‌.ए. पॅरिस येथील फ्रेंच अकादमीची ‘दिप्लोम्‌ दे सुदस्युपेरिअर’ ही पदवी (१९२०). एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई (१९०८–१७), कर्नाटक कॉलेज, धारवाड (१९१७–१९); डेक्कन कॉलेज, पुणे (१९२१); गुजरात कॉलेज, अहमदाबाद (१९२१–२२) व विल्सन कॉलेज, मुंबई (१९२२) या महाविद्यालयांत गणिताचे प्राध्यापक. त्यांचे क्रांतीकारक विचार व बाणेदार स्वभाव यांमुळे त्यांच्या नोकरीत सतत अस्थिरता राहिली.

याशिवाय त्यांना इतरही काही व्यवसाय करावे लागले. संततिनियमनाचे केंद्र (राइट एजन्सी) ते १९२१ पासून आपली पत्नी मालतीबाई यांच्या सहकार्याने चालवत होते. लैंगिक शिक्षण, संततिनियमन या महत्त्वाच्या विषयांबरोबर इतरही सामाजिक व सांस्कृतिक विषयांकडे वैज्ञानिक व चिकित्सक दृष्टीने पाहून समाजाला ती दृष्टी प्राप्त व्हावी, यांसाठी कर्वे आमरण प्रयत्नशील राहिले. त्यांच्या मते संततिनियमनाचे व्यापक उद्दिष्ट सामाजिक स्वास्थ्याचे असून, ते निकोप स्त्रीपुरुषसंबंधांवर अधिष्ठित असते. आधुनिक दृष्टीने व बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीवर योग्य ठरणार्‍या लोकशिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला. या हेतूने त्यांनी समाजस्वास्थ्य हे मासिक चालविले (१५ जुलै १९२७ — १५ नोव्हेंबर १९५३). 

ज्या गोष्टींची माहिती होणे समाजाच्या व व्यक्तीच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे, ती माहिती निर्धारपूर्वक पुढे आलीच पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. यासाठी त्यांनी १९२३ मध्ये संततिनियमन, विचार व आचार आणि १९२७ मध्ये गुप्त रोगांपासून बचाव (विचार व आचार) ही पुस्तके लिहिली. त्याचप्रमाणे वेश्याव्यवसाय (१९४०), आधुनिक आहारशास्त्र (१९३८), आधुनिक कामशास्त्र (आवृ. २, १९३४) अशी इतरही काही शास्त्रीय विषयांचे विवरण करणारी पुस्तके लिहिली. पॅरिसच्या परी (१९४६) व तेरा गोष्टी (१९४०) हे त्यांचे ललित साहित्यही उपलब्ध आहे. त्यांना रंगभूमीचेही अत्यंत आकर्षण होते. गुरुबाजी (१९३७, तार्त्युफ नाटकाचे रूपांतर) व न्यायाचा शोध (१९४६) हे चार अंकी संगीत नाटक त्याचे निदर्शक होय. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.आगरकरांनंतर प्रखर बुद्धिवादाचा निर्भयपणे व कोणतीही तडजोड न करता पुरस्कार करणारा मराठी विचारवंत म्हणून र. धों. कर्व्यांचेच नाव घ्यावे लागेल. त्यांच्या आचरणात जी नेकी होती, ती त्यांच्या विचारातही होती आणि तिचेच प्रतिबिंब त्यांच्या स्वच्छ, पारदर्शक, अनलंकृत शैलीत पडलेले आढळते. एक उत्कृष्ट गद्यलेखक म्हणूनही त्यांची आठवण राहील.

जुलै १९२७ हे वर्ष महाराष्ट्रात एक नवं पर्व घेऊन आलं.  सलग  २६ वर्षं   संततिनियमन आणि लोकसंख्या नियंत्रण याला वाहिलेल्या 'समाजस्वास्थ्य' या मासिकानं भल्याभल्यांची झोप उडवली . इतकं थेट ,आणि संपूर्ण वैज्ञानिक दृष्टीवर आधारलेलं लेखन पचवण्याची ताकद पुरोगामी म्हणून घेणाऱ्या या महाराष्ट्रात तेव्हाही नव्हती. 

मुलांची संख्या मर्यादित ठेवायची  असेल तर कुटुंब नियोजन साधन वापरायला पर्याय नाही हे त्यांनी त्यातून ठसवायचा  प्रयत्न केला.  शरीर सुख ही केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही हे ठासून सांगत त्यांनी स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याचा  चिदघोष केला . हे मासिक अश्लील ठरवलं गेलं ."अश्लीलता ही  गोष्ट कोणत्या लेखात ,चित्रात ,गोष्टीत अस्तित्वात असूच शकत नाही ती  तसे  म्हणणार्याच्या मनात असते "अशी यांची धारणा होती. यांच्यावर  अनेक खटले भरले गेले  ,शिक्षा झाल्या   यामुळे तर ही त्याची सुधारक या नावाने पेटवलेली ज्योत अधिकच प्रज्वलित झाली.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारखे ज्येष्ठ  विधिज्ञ ही त्यांच्या बाजूने खटला लढायला उभे राहिल्याची नोंद आहे.  अनेक मुलं जन्माला घालून स्त्रीच्या देहाचा खुळखुळा होतो हे असं स्पष्ट सांगण्याची हिंमत याच्या कडे होती.   पत्नी मालती यांची मोलाची साथ साथ घेऊन त्यांनी आपल्या घरात संततिनियम केंद्र सुरु केलं . . आणि हे करताना  समाजाचा रोष ओढवून घेतला तो इतका होता की जिवंतपणी त्यांची प्रेतयात्रा काढली गेली  

अश्लीलता, व्यभिचाराचे प्रश्न यासंबंधीचे त्यांचे विचार पेलणे आजही समाजाला अवघड जाते. तेव्हाच्या समाजाला तर ते मुळीच पचले नाहीत. केवळ संततिनियमनाचीच नव्हे, तर सर्वच लैंगिक प्रश्नांच्या बाबतीत बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतून निकोप व निर्भय चर्चा व्हावी, असा रघुनाथरावांचा आग्रह असे. अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, सदराचा किंवा इतर वस्तूचा गुण नसतो, तो फक्त तसा आरोप करणाऱ्याच्या मनाचा गुण आहे, हे ते सतत ठासून सांगत. स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य असले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. यावरून अनेक वाद झाले. अनेक सनातनी लोकांनी त्यांच्या कामात अडथळे आणले, सरकारने त्यांच्यावर खटले भरावेत म्हणून प्रयत्न केले. त्याप्रमाणे त्यांच्यावर खटले भरलेही गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वतीने काही खटले लढवले. काही खटल्यांमध्ये रघुनाथरावांना शिक्षा झाली. मात्र बराच तोटा सहन करूनही ते आपल्या मूळ कार्यापासून ढळले नाहीत.

लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो, असा त्यांचा विचार होता. संततिनियमनाची पुरेशी साधने, शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत. त्यामुळे स्त्री-आरोग्यावर गंभीर परिणाम होत असत. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावत असे. खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटू लागे. अशा भीतीमुळे मानसिक विकृती निर्माण होई. त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. वेश्यागमनातून बऱ्याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करत. लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या रघुनाथरावांनी या सर्व समस्यांवर कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनातून मते मांडली होती. लैंगिकतेविषयी मूलगामी विश्लेषण करून सतत सत्तावीस वर्षे त्यांनी एकाकी लढत दिली होती. त्यांच्या प्रकाशित झालेल्या साहित्यांत – आधुनिक आहारशास्त्र, आधुनिक कामशास्त्र, गुप्त रोगांपासून बचाव, त्वचेची निगा, वेश्याव्यवसाय, संततिनियमन, संततिनियमन– विचार व आचार, इत्यादींचा समावेश आहे. मुंबईतील तेव्हाच्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारांच्या तरुणांनी ‘द रॅशनलिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ही संस्था स्थापन केली होती. त्यांनी ‘रीझन’ नावाचे इंग्रजी नियतकालिक सुरू केले. प्राध्यापक र.धों. कर्वे यांनी संपादक, लेखक, ग्रंथपरीक्षक, पत्रलेखक अशा विविध भूमिकांतून ‘रीझन’ ला योगदान दिले.

स्वतःच्या पुढाकाराने त्यांनी भारतातील पहिले कुटुंबनियोजन केंद्र १९२१ साली सुरू केले. इंग्लंडमध्येदेखील याच वर्षी पहिले कुटुंबनियोजन केंद्र सुरू झाले होते. या सर्व कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी मालतीबाई कर्वे यांची मोलाची साथ लाभली. तसेच, शकुंतला परांजपे यांचा त्यांच्या कामात सक्रिय सहभाग होता. रँग्लर परांजपे, मामा वरेरकर इत्यादी लोकांचा त्यांच्या कार्याला पाठिंबा होता.

 वाढत्या लोकसंख्येचा विळखा जगाला आज गुदमरून टाकत आहे यांनी हे ९० वर्षा पूर्वीच ओळखलं हेच यांचं मोठेपण.  

भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचे हे ज्येष्ठ सुपुत्र  विचारवंत रघुनाथ कर्वे  यांची पुण्यतिथी मृत्यू १४ ऑक्टोबर ,१९५३. त्यांच्या या  अजरामरच  कार्यास प्रणाम !


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती