To Reach The People & Community!
 दिनविशेष

 क्रिकेट

गतविजेत्या इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेने २२९ धावांनी केला लाजीरवाणा पराभव !

THE XYE   21-10-2023 23:14:59   110

गतविजेत्या इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेने २२९ धावांनी केला लाजीरवाणा पराभव !

या पराभवामुळे उपांत्य फेरीत जाण्याची वाट झाली कठीण !!

मुंबई दि. २१ (क्रीडा प्रतिनिधी) - आज गतविजेत्या इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेकडून तब्बल २२९ धावांनी मानहानीकारक पराभव झाला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत सात गडी गमावून ३९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २२ षटकांत केवळ १७० धावा करू शकला. या स्पर्धेतील विश्वविजेत्या संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. याबरोबरच दक्षिण आफ्रिकेला तिसरा विजय मिळाला आहे. या मोठ्या पराभवामुळे उपांत्य फेरीत जाण्याची त्यांची वाट खूपच कठीण झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ गडगडला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २२९ धावांनी मोठा विजय मिळवता आला. या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे.

इंग्लंड संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्यांची खराब कामगिरी कायम आहे. त्याला चार सामन्यांत तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडचा पराभव झाला आहे. त्यांचा एकमेव विजय बांगलादेशविरुद्ध होता. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने तिसरा विजय मिळवला आहे. त्याने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा पराभव केला आहे. त्यांचा एकमेव पराभव नेदरलँडविरुद्ध झाला आहे. इंग्लंडचा पुढील सामना २६ ऑक्टोबरला बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. त्याचवेळी २४ ऑक्टोबरला आफ्रिकन संघ बांगलादेशविरुद्ध मुंबईत खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डीकॉकच्या रुपात मोठा धक्का बसला होता, त्याला फक्त चार धावा करता आल्या. पण त्यानंतर रीझा हेंड्रीक्स आणि रॅसी व्हॅन डर दुसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचली आणि त्यामुळे त्यांनी विजयाचा पाया तिथेच रचला होता. दुसेनने यावेळी ८ चौकारांच्या जोरावर ६० धावांची खेळी साकारली, तर रीझाने यावेळी ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ८५ धावांची धमाकेदार खेळी साकारली. हे दोघे ठराविक फरकाने बाद झाले. पण त्यानंतर मैदानात क्लासिन नावाचे वादळ आहे. कारण क्लासिनने धडाकेबाज शतक झळकावले आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली. क्लासिनने यावेळी क्लासिक खेळी साकारली. क्लासिनने ६७ चेंडूंत १२ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर १०९ धावांची दणदणीत खेळी साकारली. क्लासिन बाद झाला पण तरीही संघाची धावगती मात्र कमी झाली नाही. कारण त्यानंतर मार्को जेन्सनन मैदानात होता आणि त्याने तडफदार फटकेबाजी केली. जेन्सनने यावेळी फक्त ४२ चेंडूंत ३ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ७५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला इंग्लंडपुढे ४०० धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ गडगडला आणि त्यांच्यावर लाजीरवाण्या पराभवाची नामुष्की ओढवली. या विजयासह गुणतालिकेत बदल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे आता सहा गुण झाले असून ते तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती