To Reach The People & Community!
 दिनविशेष

 छत्रपती संभाजी नगर

समृद्धी महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याकडेला ट्रकला दिली धडक; भीषण अपघातात १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू

THE XYE   15-10-2023 15:05:20   96

समृद्धी महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याकडेला ट्रकला दिली धडक; भीषण अपघातात १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू 

छ. संभाजी नगर दि.१५ (प्रतिनिधी) - समृद्धी महामार्गाने बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅव्हलरमधील १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तसेच २३ जण जखमी झाले आहेत. या टेम्पो ट्रॅव्हरलमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ पंतप्रधान कार्यालयानेही अपघातग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर शनिवारी (१४ ऑक्टोबर) मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात ६ वर्षांच्या एका चिमुकल्यासह १२ जण जागीच ठार झाले आहेत.  बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने छत्रपती संभाजीनगरमधील जांबरगाव टोल नाक्याजवळ रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात १२ जणांचा तात्काळ मृत्यू झाला. 

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे, नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ मध्यरात्री झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती