To Reach The People & Community!
 दिनविशेष

 नॅशनल

ज्वारीची ग्लोबल भरारी; मिलेट्स मॅन तात्यासाहेब फडतरे, जर्नी ऑफ जर्नलिस्ट टू आंत्रप्रन्योर

THE XYE NEWS   13-11-2023 21:53:09   55073

आधीच्या पिढीपर्यंत ज्वारी, बाजरी, नाचणी हेच आपले मुख्य अन्न होते. हरीत क्रांतीनंतर केवळ प्रतिष्ठेपायी ही भरड धान्ये मागे पडली. पण २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष जाहीर झालं आणि पारंपरिक भरड धान्य, त्यावर प्रक्रिया करुन बनवलेले पदार्थ यांच्याबाबत जाणीव, जागृती होऊन नव्याने लोकांकडून त्याला मागणी येऊ लागली आहे. पुण्यातील सरोजिनी आणि तात्यासाहेब फडतरे या दांपत्याने काळाची पावले ओळखून, देवळाली प्रवरा आणि इंदापूर राहुरी येथे 'समृद्धी ॲग्रो ग्रुप' या नावाने भरड धान्यप्रक्रिया उद्योग २०१३ सालीच सुरु केला. तिथे त्यांची स्वत:ची शेती होती. 

 

सरोजिनी या गृहविज्ञान शाखेच्या पदवीधर, तर त्यांचे पती तात्यासाहेब फडतरे हे कृषीपदवीधर आहेत.ते  हैद्राबाद इथे इटीव्हीमध्ये पत्रकार म्हणून काम करत होते. सरोजिनी या पुण्यात घरच्या शेतातल्या ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी या धान्यांची पीठे काढून ती ग्राहकांना पुरविण्याचा व्यवसाय करत असत.सरोजिनी यांना मुळातच विविध खाद्यपदार्थ करण्याची आवड होती.  मुलींच्या पोटात पौष्टीक पदार्थ जावेत म्हणून ज्वारीच्या पिठाची चकली, नाचणी रव्याची इडली असे पदार्थ त्या मुलींना खाऊ घालत.  त्यापैकी त्यांच्या मुली जो पदार्थ आवडीने खात तो पदार्थ मोठ्या प्रमाणात करुन बाहेरच्या ग्राहकांना विकायला त्यांनी सुरूवात केली. जीवनशैली संबधित आजारांमध्ये झालेली वाढ आणि करोना नंतर पौष्टिक खाण्याकडे वाढलेला लोकांचा कल यामुळे सरोजिनी यांच्या भरड धान्यापासून बनवलेल्या पदार्थांना लोकांकडून मागणी वाढू लागली. 

 

तयार पदार्थ दूरवर पोहोचवण्यातल्या मर्यादांमुळे भरड धान्यांचा रवा काढून त्याची विक्री सुरू केली 

विविध प्रदर्शनात भाग घेऊन सरोजिनीताई ज्वारी, बाजरी, नाचणी यापासून इडली, शंकरपाळी, चकली असे अनेक पदार्थ ग्राहकांना उपलब्ध करुन देत होत्या.लोकांना पौष्टिक खायला मिळत होते, खप चांगला होता, पण त्यामागे खूप कष्ट होते.मागणी वाढत होती. हे काम एकट्याचे नाही हे सरोजिनी यांच्या लक्षात आलं. इतरही काही कारणांमुळे हा व्यवसाय त्यांनी बंद केला.एका ग्राहकाची इडल्यांची मागणी होती, पण दूरवर इडल्या कशा पोहचवणार हा प्रश्न होता. त्यातून भरड धान्यांचा रवा काढून त्याचा व्यवसाय करण्याचा विचार त्यांनी केला. तात्यासाहेब यांनी या व्यवसायात भविष्यात होणारा फायदा ओळखून पत्रकारितेला रामराम केला आणि या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. 

 

३०० हून अधिक शेतकरी समृध्दी ॲग्रो ग्रुपचे सभासद आहेत 

 

फडतरे दाम्पत्याने देवळाली प्रवरा आणि इंदापूर राहुरी येथे 'समृद्धी ॲग्रो ग्रुप' या नावाने धान्य प्रक्रिया उद्योग २०१३ साली सुरु केला. ज्वारी,बाजरी,नाचणी ही कोरडवाहू पिके घेऊन आपला शेतकरी थांबतो.याची विक्री करणं, बाजारपेठ मिळवणं त्याच्यासाठी अवघड असते. 'समृद्धी ॲग्रो ग्रुप' मुळे त्यांना त्यांच्या पिकांच्या विक्रीसाठी एक व्यासपीठ मिळालं. पिकांच्या लागवडीपासून ते प्रक्रिया उद्योगाच्या या प्रवासात जिल्ह्यातील सेंद्रिय पध्दतीने शेती करणारे अनेक शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. मायनर मिलेटमध्ये  फॅास्टेल, बनियार्ड, कोडो यांचे उत्पादन घेणारे कर्नाटक, तामिळनाडूमधील शेतकरी नव्याने या ग्रुपमध्ये जोडले गेले आहेत. सुमारे ३०० हून अधिक शेतकरी समृध्दी अॅग्रो ग्रुपचे सभासद आहेत. 

 

नाचणीचा ब्रेड, मिश्र धान्यांचे कुरकुरे असे लहान मुलांना आवडतील असे पदार्थ विकसित केले.   

यानंतरच्या टप्प्यात सरोजिनीताईंनी नाचणी, बाजरी, ज्वारी रवा, या धान्यांचे पोहे, पफ, कोणतेही कृत्रिम रंग, प्रिझरव्हेटिव्ह न वापरतां बिस्किटे, रेडी टू इट, रेडी टू कुक इडली मिक्स, उपमा मिक्स, डोसा मिक्स असे अनेक प्रकार विकसित करून आपल्या उत्पादनांमध्ये वैविध्य आणलं. नाचणीचा ब्रेड, लहान मुलांना आवडतील असे मिश्रधान्यांचे ‘कुरकुरे’ असे वेगळे पदार्थही त्या देतात.सध्या झटपट बनणारे पदार्थ खाण्याकडे नवीन पिढीचा कल आहे.त्यामुळे चविष्ट आणि पौष्टीक अशा ज्वारी, बाजरी आणि नाचणी पासून बनविलेल्या रेडी टू इट, रेडी टू कुकया पदार्थांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.

 

नव्या, जुन्या सगळ्या मार्गांचा वापर करत व्यवसायाचा विस्तार केला. 

आपलं उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचण्यासाठी तात्यासाहेब कायम प्रयत्नशील असतात. ग्राहकांपर्यत पोहचण्याच्या नव्या, जुन्या सगळ्या मार्गाचा वापर करत त्यांनी या व्यवसायाचा विस्तार केला आहे. सुरवातीला मित्रमंडळ,  नातेवाईकांना प्रत्यक्ष फोन करुन ते ग्राहकांशी संपर्क साधत होते. आज जवळपास ११००० च्या वर त्यांचे व्हॉटसअॅळपवर संपर्क आहेत. चांगले आरोग्य लाभावे यासाठी जागरुक असलेली मंडळी या ग्रुपमध्ये आहेत. त्यांच्यासाठी पौष्टीक आहार, काय खावे,  कसे खावे,  यासंदर्भातील रेसिपी, लेख, मेसेजेस ते ग्रुपवरती दररोज पाठवतात.व्हॉटसअॅापवर स्टोरी, स्टेट्स, फेसबुक, इंस्ट्राग्रामवर फोटो, व्हिडिओ लेख ते नियमितपणे देत असतात. 

७५ लाखांची वार्षिक उलाढाल असलेल्या समृध्दी अॅग्रो ग्रुपची उत्पादने आज महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद तसंच महाराष्ट्राबाहेर, परदेशात अमेरिका, दुबई, स्पेन, अमेरिका, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका देशांमध्ये पोहोचली आहेत. तिथे स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी त्यांचे नातेवाईक ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ आवर्जून घेऊन जातात. परदेशात या पदार्थांची लोकप्रियता वाढली आहे.

 

उद्योगाला राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा एक लाख रूपयांचा पुरस्कार

‘महाराष्ट्र स्टार्टअप’ यात्रेतंर्गत २०२२ मधे नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळावे यासाठीच्या महिला नवउद्योजक गटामध्ये सरोजिनी फडतरे यांच्या ‘मिलेट ट्रेडीशनल फुड फॉर हेल्थ’ (Millet traditional food for health) या संकल्पनेवर आधारित ‘स्टार्टअप’ उद्योगाला राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा एक लाख रूपयांचा पुरस्कार तसेच सरोजिनी आणि तात्यासाहेब यांना ‘दे आसरा’ फाउंडेशनचा यशस्वी उद्योजकतेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

ग्राहकांचा विश्वास संपादन करणं, दर्जा सांभाळत टिकून रहाणं हे महत्त्वाचं आहे असं तात्यासाहेब मानतात.समृध्दी अॅग्रोचा पहिल्यापासूनचा ग्राहकवर्ग तोच आहे, त्यामुळे त्याला सतत काहीतरी नवीन द्यायला हवं. या दृष्टीकोनातून दोघांचेही प्रयोग सतत चालू असतात आणि या प्रयोगाशीलते मुळेच त्यांच्या व्यवसायाची वृद्धी होत आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती