पुणे – सोलापूर महामार्गावर ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू
पुणे.दि.२१. ( प्रतिनिधी ): पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वरील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली.
या घटनेनंतर ट्रकचालक पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश विठ्ठल हवालदार (वय २६), आदित्य हरिदास साठे (वय २६, रा. दोघे रा. महादेवनगर, हडपसर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गणेश आणि आदित्य पुणे-सोलापूर महामार्गावरुन हडपसरकडे निघाले असताना कदमवाक वस्ती परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार गणेश आणि सहप्रवासी आदित्य गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या गणेश आणि आदित्य यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.